द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Published Books - प्रकाशित पुस्तके

 लेखक - द. स. काकडे, कादंबरी
कादंबरी क्रमांक 041 ते 060
अगोदरचे पान - कादंबरी क्र. (001 ते 020) - (021 ते 040) - (041 ते 060) - (061 ते 079) - पुढचे पान

अनु. क्र.

मुखप्रुष्ठ

पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष प्रकाशक प्रुष्ठ संख्या

041

फार्म हाऊस 1997 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे. 110
प्रसिध्दी 1997, चंद्रमौळी प्रकाशन, पुणे.

दुसरी आवृत्ती 2009, अजब पब्लिकेशन, कोल्हपूर.
"हंबीरराव, आता जो तो लुंगा सुंगा उठतो. बागायती शेतीत सिमेंट पत्र्याचं, नाहीतर मंगलोरी कौलांचं झोपडं बांधतो. त्यालाच तो फार्महाऊस असं बेगडी नाव देतो. नवीन हायवेला जसे जुन्या खानावळ्यांच्या जागी जेवणाचे धाबे आले तसे जुन्या झोपड्यांच्या जागी हे फार्महाऊस."
"देशमुख साहेब, तुम्ही आमचं फार्म हाऊस तर पहा .. चांगल्या दगडी चिरांचं. त्यासाठी आम्ही दगडीची खाण पाडली. सुरूंग उडवले. मामलेदार साहेबांची परवानगी घेतली. तुमचा हा चिरेबंदी वाडा आहे. पण आमचं फर्महाऊस पाहून एका सिनेमावाल्यानं तेथे त्याच्या पिक्चरच शुटींग केलं."
"बस .. तुमच्या फार्महाऊसचं आम्हाला कौतुक नाही.. आम्हाला तुमच्या जुन्या वाड्याचाच अभिमान. तो वाडा पाहूनच आम्ही तुम्हाला आमची तरूण मुलगी देणार आहोत.. आपण देशमुख, इनामदार, पाटील घराण्यातल्या पुरूषांनी आपली परंपरा जपायची."
"अहो, पण काळाप्रमाणे .."
"तुमच्या घराण्यात बैलांच्या गाड्याच्या शर्यती, बैलांच्या , रेड्यांच्या झुंजी .."
"हे सारं रानटी समजतो मी.. हे रानटी वेड सरकार बंद करतयं, हे चांगलं.."
"म्हणजे तुम्हाला आमचं बोलणं आवडणार नाही.."
"तुम्ही तुमचा जुना वाटा म्हणे गावच्या शाळेला दिलात.. फार्म हाऊसमध्ये राह्यला गेलात.. हे तुमचं भिकारी लक्षण. आमची मुलगी तुम्हाला कशी देणार?"
सरंजामी आणि नवविचारांवर भाष्य करणारी ग्रामीण पार्श्वभूमीवरची कादंबरी.

042 वैजयंता 1999 एस. के पब्लिकेशन्स, पुणे. 162
प्रसिध्दी 1999, युमिटी प्रकाशन, पुणे.

"वैजयंता, तुझ्या आईचा न माझा काय संबंध? तुझ्या आईची साक्ष काढण्याचं कारण?"
"कारण? माझा खरा बाप कोण आहे, हे माझ्या बापापेक्षा आईच जास्त सांगू शकेल."
"प्रिन्सिपल वैजयंता मॅडम .. तू माझी कन्या नव्हेच.."
"खानदानी पुरूष संभाजीराव पाटील, कायदेशीररित्या तुमच माझं ब्लडचेकींग झालं तर .. शास्त्रीय दृष्ट्या बापमुलीचे निकष पुढे आले तर.. त्यासठी मी म्हणत्ये, माझ्या आईलाच माझा बाप कोण विचारूया .."
"याची काही गरज नाही."
"संभाजीराव पाटील, तुमचं तरूणपण आठवा ...तुम्ही कॉलेजात होता तेव्हा ..."
"मला काही आठवत नाही."
"तुमच्या शेतात काम करणा-या रंगा नावाच्या तरूणीला तुम्ही डोहात पाडलत .."
"कोण ही रंगा तरूणी ..?"
"त्या रंगा तरूणीला तुमच्यापासून दिवस गेल्यावर तिनं तिच्या पोटातल्या जिवासह विहिरीत उडी घेतली, तेव्हा बजाबा नावाच्या तरूण जिवानं तिला वाचवलं. घरी नेलं. स्वत:व्या नावाचं कुंकू लावल. जन्माला आलेल्या मला त्यानं वैजयंता नाव दिलं."
"वैजयंता .. तू त्याचीच मुलगी. त्याच्याच रक्ताची तू. तूझं नाव वैजयंता बजाबा शिंदे .."
"बस्स .. तुम्ही काही बोलू नका. तुमच्या सारख्या खानदानी पुरूषाचं बाप म्हणून नाव लावण्यापेक्षा बजाबा शिंदे ह्या सामान्य पुरूषाचं बाप म्हणून नाव लावण्यात मला अभिमान आहे."
आपल्या कर्तृत्वानं एका कन्याशाळेची प्रिन्सिपलं झालेल्या वैजयंताची ही तेजस्वी अशी कहाणी.

043 अंत्ययात्रा 1999 एस. के पब्लिकेशन्स, पुणे. 184
प्रसिध्दी 1999, युनिटी प्रकाशन, पुणे.

मुरली बायकोपोरांसह मुंबईवरनं बापाच्या अंत्ययात्रेसाठी आला होता. पण त्याचे हात बापाच्या प्रेताला लागू द्यायचे नव्हते म्हणून त्याच्या दोन्ही सावत्र भावांनी बापाच्या अंत्ययात्रेची घाई केली. बापाची चित्ता स्मशानात पेटवली. जळत्या चित्तेतून प्रेताची कवटी फुटल्याचा आवाज होताच लोक उठले. नदीपात्रात हातपाय धुवून निघाले.
मुरली नदीपात्राच्या कडेला असणा-या स्मशानात आला तर त्याचे दोन्ही भाऊ न आई यांनी मुरलीला अडवलाच.
"हे काय? मी अंत्ययात्रेला येण्याआधीच बापाची चित्ता पेटवली तुम्ही .."
"तुझा तो बाप होता .. आमचा वैरी तो. त्याला जिवंतपणी पेटवता आला नाही. म्हणून मेल्यावर पेटवला तो! आम्ही त्याची अंत्ययात्रा काढली नाही. तर मृत्यूयात्रा काढली."
मुंबईचा सुशिक्षीत मुरली आणि त्यच्याशी वैर धरणा-या गावच्या अडाणी सावत्र भावांची जीवघेणी कादंबरी.

044 माणूस 1999 एस. के पब्लिकेशन्स, पुणे. 240
कादंबरी - माणूस - प्रसिध्दी १९९९ : एस.के.पब्लिकेशन्स, पुणे.

लेखकाने ही कादंबरी आत्मचरित्रात्मक कादंबर्या लिहीणार्या आनंद यादवांस अर्पण केलेली आहे. ह्या माणूस कादंबरीतील माणूस म्हणजेच लेखकाचा बाप. अफलातून जीवन जगणार्या बापाची ही कथा. ब्रिटीश काळात रॉकेलधंदा करणारा हा माणूस अक्षरश: पैशात लोळतो. पण निर्मोही वृत्तीचा. कसलेच भय न बाळगणारा. चुलत्याने फसवून त्याला मुंबईच्या धंद्यातून उडवला तरी समाधानात जगणारा. विहीरीवर पाण्याने भरलेला हंडा उचलताना तो हंडा घेऊन पडतो. पोट फाटते. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागते. हगणे, मुतणे बंद होते. ऑपरेशन होते. बाप जगणार नाही, हे डॉक्टर लेखकाला सांगतात तर अंथरूणावर काहीसा शुध्दीवर असलेला बाप डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर, मी तुम्हाला जगून दाखवतो. जबर्दस्त इच्छाशक्ती असणारा मनुष्य काय चीज असते, हे सारे चित्रण ह्या कादंबरीत आहे.

045 पाख-या 2000 एक्सल प्रिंटर्स, पुणे. 120
कादंबरी - पाखर्या - प्रसिध्दी २००० : युनिटी प्रकाशन, पुणे.

पाखर्या घोडदौड करीतच जंगल पट्टीत गेला. मोगा त्याच्या प्रेमात होती. जंगलपट्टीतल्या बेहड्याच्या झाडाखाली हैदर्या थैथया नाचतच त्या दोघांकडे पाहत होता. खिंकाळत होता. मोगा तू जंगलच्या आमदाराची लेक आहेस. मी हा असा फाटका. तुPया मोठ्या घराला काळ लावू नकोस. पाख-याच्या पराक्रमानं त्याच्या दिलदार वागण्यानं मोगा त्याच्यावर लट्टु होते. पण रंगनाथरावाशी मोगाचं लग्न झालं. तिच्या डोळ्यातनं अश्रु वाहत होते. जाताना ती आमदार बापाला बोलली मी रंगनाथरावाशी लग्न केलं नाही, माझं लग्न पाख-याशी झालंय असंच समजते. रंगनाथरावलाच मी पाख-या समजणार... त्याला पाखर्या म्हणूनच हाक घालणार. लग्न मंडप घातलेल्या वाड्याकडे पाखर्याचा हैदर्या घोडा चौफेर उधळत येत होता. पण त्याच्या पाठीवर पाखर्या नव्हता... जंगलपट्टीच्या पार्श्वभूमीवरील एक तेज प्रेमकहाणी.

046   सन्यस्त 2000 एक्सल प्रिंटर्स, पुणे. 158
कादंबरी - सन्यस्त - प्रसिध्दी २०००: एस्सेल प्रिंटर्स, पुणे.

स्त्री काय, पुरूष काय? आत्महत्या का करतात? जगण्याचा मार्ग संपला की त्यांना आत्महत्या करावीशी वाटते. जीवनावरचा, जगण्यावरचा विश्वासच उडाल्यावर कोण जगेल? संसारापासून पळणार्या स्त्री-पुरूषांचं तरी काय? राजपूत्र सिध्दार्थनं का गौतमबुध्द होण्यापर्यंतचा प्रवास करावा? संन्यस्तांचा प्रवास लेखकाला मोहविणारा. सर्वसामान्य जीवन जगणार्या अशाच एका संन्यस्ताची ही कहाणी अंतर्मुख करते.

047 तांबडी माती 2000 शांती पब्लिकेशन, पुणे. 176
प्रसिध्दी 2000 शांती पब्लिकेशन्स, पुणे.

"गोजा, तू तांबड्या मातीत खेळणा-या पैलवानाची बायको .. पैलवानाला बाई म्हंजी दूख. तरी बी ऐक मी बी एका पैलवानाची बायको. पैलवानाचं दुख ... पैलवानाच्या बायकोचं दुख ... आमी दोघा नवरा बायकोनं एकमेकांना साभाळून घेतलं ... माझ्या नव-यानं आखाड्याची तांबडी माती सांबाळली आणि मला बी सांबाळली .. पैलवानकीचा त्यानं अतिरेक केला नाही .. मला त्यानं गोड पोरं दिली ..."
"कौसामामी, हेच सांगाया मी आलोय इकडं गोजाला .."
"जावई, तुमी पैलवान म्हणून गोजाला माहेरी पाठवलं, हे तरी खरं ना?"
"कौसामामी, माझी तांबड्यामातीच्या आखाड्यात महाराष्ट्र केसरी पैलवानाशी कुस्ती हाये."
"म्हंजे गोजाका घरला नेऊन तिच्याकडनं कुस्तीचं डावपेच शिकणार का काह्य?"
गोजानं कौसाकाकूच्या तोंडावर हात ठेवला. बोलली "ह्यांना कडुलिंबाच्या पाल्याचा रस काठून द्यायला नको का सकाळचा? खारीक, खोबरं, काजू, बदाम, आक्रोड तुपात खलवून द्याय नको? चांगला खुराक दिल्या बगर ह्यांची तब्येत होणार कशी? कपर्दिकेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्र केसरीला ह्यांनी अस्मान दाखवायला पाह्यजे."
ते ऐकून उतरत्या वयाची, पैलवान तात्याची अनुभवी कौसाकाकू बोलली, "गोजा, माझ्या पैलवान जावयाला चांगली हिंमत दे .. जावयाला कळू दे पैलवानानं लगीन केलं म्हणजे बायको काही आड येत नाह्य ..."
तांबड्या मातीत खेळणा-या पैलवानाची मस्ताड कहाणी.

048 पुरुष 1997 पार्टनर पब्लिकेशनस्, पुणे. 175

प्रसिध्दी मार्च,2000, पार्टनर पब्लिकेशन

"मॅडम, रात्र ही पापाची जननी म्हणतात .. त्यात मी मेल प्रॉस्ट. म्हणजे गायरानतला मस्तवाल असलेल्या गायांमागं लागणार वळू, खोंड. तोच त्यांची रग, मस्ती. तुमच्यासारख्या हायसोसायटीतल्या उठबळ बायकांना सुख देणारा .. त्यांच्याकडनं पैसे घेणारा मी तरणाबांड पुरूष."
"बस .. सद्या मला एक लव्हर भेटलाय .. तो सद्या मला पुरेसा आहे."
"कोण? तो भरत जोशीच का?"
"नुसता भरत जोशी का? माझ्या गॉसिपमध्ये असए अनेक .."
"पण माझ्यासारखा पुरूष .."
"तुला पैसेच हवेत ना?"
"तुमचं सिनेमाचं शुटींग संपलं की भेटतो .."
"शुटींगसाठी चांगला देखणा फोटोग्राफर आलाय. माझे किस घेऊनच तो खूष आहे. त्याला मी .."
"म्हणजे ..."
"अरे, पैसे फेकले तर माझ्यासारख्या देखण्या हिरॉईनला कोण सोडेल का?"
एक मेल प्रॉस्ट आणि त्याच्याशी खेळणा-या अनेक श्रीमंत बायकांची कहाणी.

049 जखम 2000 शांती पब्लिकेशन, पुणे. 170
कादंबरी - जखम - प्रसिध्दी २००९: चंद्रमौळी प्रकाशन, पुणे.

मृतावस्थेत पडलेल्या शामकांतच्या चेहर्यावरनं मी हात फिरवला. त्याचे डोळे उघडे होते. ते मी झाकू पाहात होतो. त्याच्या उघड्या पापण्या बंद होईनात. माPया डोÈयातनं सांडणार्या अश्रुंनी त्याचे डोळे भरले. मृतावस्थेतही तो अश्रुभरल्या डोÈयांनी माPयाकडे पाहात होता. दोस्तीची टचेबल कहाणी.

050 बापलेक 2000 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे. 221
कादंबरी बापलेक - प्रसिध्दी - २००० चंद्रमौळी प्रकाशन, पुणे.

लेखकाच्या जीवनाचाच भाग असलेली ही कादंबरी. त्याचे आणि बापाचे व्यक्तिचित्रण कमालीचे सजीव आहे. कादंबरीचे कथानक झपाटून टाकणारे आहे. कादंबरीतील खलपात्रे बाळशाबाबा, आबुराव, उध्दव, श्यामराव वाटपाच्या निमित्तानेकसा स्वार्थी खेळ खेळतात. पण कथानायक आणि त्याचा बाप किती सहनशीलपणा दाखवून सामना करतात. साराच अजब खेळ. एकमेकांवर जीव टाकणार्या बापलेकाची ही कहाणी हृदयस्पर्शी झालेली आहे.

051 घरंदाज 2000 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 195
प्रसिध्दी 2000, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

"कांता तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर.." रंगनाथ बोलला.
"हो, हरिश्चंद्रगडावरनं उडी घेणार का?"
"हो."
"मग जा की .. मार उडी, हरिश्चंद्र गडापेक्षा कोकणकडा मरायला बरा.."
"तू लग्न कुणाशी करणार हे सांग. मग मी मरायचं बघतो नंतर.."
"माझ्या इस्टेटीचा प्रश्न लवकरच निघेल. लग्नाला वेळ लागला तरी परमेश्वर चांगला नवरा दिल्याशिवाय राहाणार नाही."
"चांगला म्हणजे?"
"घरंदाज मुलीला शोभेल असा घरंदाज मुलगा .."
सत्शील तरूणी कांताची सत्शील कथा.

052 जन्मदु:खी 2009 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 224
प्रसिध्दी 2012, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

द.स.काकडे यांच्या "पाळणा" ह्या लघुकथेवरची ही कादंबरी. शांतू आणि अंबू ह्या दोघीही देखण्या. केवड्याच्या बनातल्या नागिणी आपल्या सुवर्णकांतीनं उजळून निघाव्यात अशा ह्या दोघी. त्या दिनूच्या विराण भकास आयुष्यात आल्या. पहिली बायको तीन मुलांचा नजराणा देऊन गेली. पण ती मुलं गेली ती गेली. तिच्यानंतरची दुसरी अवघी सोळा वर्षाची अंबू.. तिने पण एका मुलाची भेट दिली.. पण तेही मूल गेलं. नंतर ती गेली.
देवानं त्याच्या हाती माणिक - मोती दिलं पण जन्मदु:खीच तो. त्याच्याच आयुष्याची ही कादंबरी.
 

053 घरभेदी 1993 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे. 178
कादंबरी घरभेदी - प्रसिध्दी -२००० : पार्टनर पब्लिकेशन्स, मुंबई

लेखकाने आमच्या पन्नास माणसांच्या एकत्र कुटुंबातील जानकी आजी आणि यशोदा आत्यांच्या स्वाभिमानी स्मृतीस ही कादंबरी अर्पण केलेली आहे. ही दोन पात्रेच ह्या कादंबरीतील प्रमुख नायिका आहेत. कुटुंबातील एक सज्जन भाऊ व वाटपाचा आग्रह करणारे तीन घरभेदी लबाड भाऊ यांचे सुरेख चित्रण या कादंबरीत करण्यात आले आहे. मनाची पकड घेणारी ही दर्जेदार बोधप्रद कादंबरी प्रत्येक कुटुंबाने वाचावी अशीच आहे. घरभेदी ही कादंबरी नवीन आवृत्तीत सख्खे भाऊ ह्या नावाने कादंबरी प्रांतात आलेली आहे. प्रथमेश पब्लिकेशन्स ह्या कोल्हापूरच्या प्रकाशन संस्थेने डिसेंबर, २००९ ला ही कादंबरी प्रसिध्द केलेली आहे.

054 घातकी 2009 युनिटि प्रकाशन, पुणे. 224
प्रसिध्दी 2001 युनिटी प्रकाशन, पुणे.

कुकडी घरणाच्या पाण्यानं सोन्याचा पाच एकर ऊस पाणी पिऊन डुकरागत माजलाता. पाच एकराच्या केळी जवानीची केंबळं छाताडाला लावून त्यावर पदर ओढत , उभी होती. दोन एकरात हिरवी लाल टमाटं, बाकी वावरात फ्लावर, कोबी, काटेरी वांगी, भेंडी समदा तरकारी माल नारायणगाव, ओतुरच्या मार्केट यार्डाला टेंपोने पळत होता. सोन्या कष्टाला नंबरी गडी. साताठ जर्सी गायीचं दूध दोन टैम डेरीत जायचं. अस केळी, तरकारी माल दूध समद्याचा पैकाच पैका गावच्या जिल्हा बॅंकेत जमा. घरच्या कपाटात बी बंडलं कोंबलेली. पैकाच पैका. बुडाखाली हिरोहोंडा होती. फार्महाऊस पुढं फोरव्हिलर जीप, चिंचेच्या झाडाखाली ट्रॅक्टर उभा. त्याच्या मागं ट्रॉली अडकवलेली.

दाम करी काम. दामानं सोन्या काम करून घ्यायचा. गावात तो सोसायटी, दूध डेअरी, ग्रामपंचायतच्या भानगडीत पडायचा नाही. त्याला बायकांच्या भानगडी आवडायच्या. त्यात त्याला लय सुरसुरी. इंद्राची अप्सरा बी हाती घ्यायची तयारी होती. त्यातली एखादी हाती लागली तर त्याच्या शरीरात इज झिम्मा खेळायची. जागी पाय ठैरायचा नाही. मन छबिन्याच्या डिपांग डिपांग हडीपांग डिपांग आवाज देणा-या ढोलाच्या तालावर ताल धरायचं.

ह्याच सोन्याची बायको शाली चांगली सणसणीत पण तिच्यापेक्षा त्याला पंछी लै भन्नाट वाटली. ती त्याच्यापुढं सारखी नाचायची. रातच्याला सपनात यायची. झोप हरामी करायची. पंछी पण बागायतदार सोन्याच्या चालीला भुलली. जमल त्या बागायती शेतात भेटू लागली. तिच्या भावाची तिच्यावर ससाण्यागत नजर होती. तेजा त्याचं नाव. लै तेज गडी. भल्या भल्या बलदंड गड्यांना तो आडवं करी. जमिनीची धूळ चारी. त्यानं सोन्या बागायतदाराला पंछीचा माग काढताना पाह्यला. त्याचं ऊर धपापलं. भैनीमागं हा सोन्या?

सोन्याला काय झालं नी कसं झालं ते कळलचं नाही. बंदुकीचा बार झाला. सोन्या धाडदिशी पाण्याच्या टाकीच्या बाजूला कोलमडून खाली पडला. सोन्यानं आपल्या छातीला हात लावला सारं रक्त बाहेर उसळत होतं. तेज्याची तेज फरशी त्याच्या छातीत रूतली होती.

055 भागधेय 2000 पार्टनर पब्लिकेशन, विरार, ठाणे. 200
प्रसिध्दी 2001 पार्टनर पब्लिकेशन्स, मुंबई.

जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनाला पुंजा न वकिल्या आले होते. पिवळ्याधम्म भंडारानं ते रंगले होते. समोरनं गोपा पाटील आले. त्या दोघांनी त्यांना हात जोडले.
"पाटील. आम्ही दोघांनी पुन्हा एकत्र राह्यचं ठरवलंय."
"पण तुम्ही दोघांनी पहिलं लग्न मोडून नवा संसार मांडला होता ना!" पाटील बोलले.
"आमच्या नशिबात पहिलाच संसार खरा म्हणायचा." पुंजा बोलली.
"मग आता खंडोबाला काय नवस केला?"
"नवस? नवस कसा असणार? आमचा संसार पुन्हा मांडलाय, तो सुखाचा होवदे .."
"वकिल्या, पण वंशाच्या दिव्याशिवाय तर सुखी संसार होऊ शकत नाही. तुझ्याकडून पोर होत नाही म्हणून ह्या पुंजानं लाथेखाली तुडवला, तुला सोडलं. पोरासाठी तिने नवा नवरा बघितला."
"पाटील, मी बी दुसरी बायको केली .."
"तुमचं भागधेय असं .. तुम्हा दोघांना तिथंबी पोर झालं नाही .."
ते ऐकलं न दोघानी एकमेकांकडं पाहिलं.
"पाटील, वंशाचा दिवा आमच्या नशिबात नसेल तर त्याची आस का धरायची. पोराची आस सोडली तर आमी सुखानं एकमेकांसाठी जगू ..."
वांझ स्त्री आणि पुरूषत्व कमी असलेल्या समंजस जोडप्याची कथा.

056 सोडीला मी गाव 2006 पायल पब्लिकेशन, पुणे. 170
कादंबरी - सोडिला मी गाव - प्रसिध्दी २००६: पायल पब्लिकेशन, पुणे.

आई-बाबा, मी आता मुंबईस निघतो, गाव सोडतो.
जा, तू. आम्हाला घर, शेती आहे -विधवा सुनेला माहेरी हाकललं तुम्ही - कोर्टात जाईल ती.
कोर्टात आम्ही सांगू. आमचा थोरला मुलगा मेला, तशी ही सून बी आम्हाला मेली.
आईबापाचं बोलणं माPयासारख्या लेखकाला पटणारं नव्हतं. वहिनीच्या माहेरी जावे, तिला समजून सांगावे.
मी तिच्या माहेरी निघालो, तर पाय ठेचाळले. डोळ्यासमोर देऊ उभी राहिली. अंतरातलं पाणी ढवळलं. देऊ... वहिनीची धाकटी बहिण, माझी गोरी मेहुणी... मोठी गोड पोर.
मुंबईहून गावी गेलं की तिकडं एक फेरी व्हायची. कारण? ती मला द्यायची ठरली होती. तिला मी पाह्यलं की मोहरून निघायचो. मी बी.ए. करीत होतो. लग्नासाठी दोन वर्षे त्यांना थांबा म्हणालो. कारण नोकरी करून मी बी.ए. करीत होतो. पण वहिनीच्या माहेरचे थांबले नाहीत. लग्नाची घाई केली.
देऊ, तिचं काय?
ती सासरी रमली नाही. माहेरीच निघून आली. वहिनीच्या माहेरी निघालो तेव्हा पाय ठेचाळण्याचं हेच कारण...
देऊ आणि मी...
आता कोणत्या नात्यानं आम्ही दोघं समोर येणार होतो.
माPयामुळे ती आणखी बदनाम होणं मला आवडणारं नव्हतं.

057 पानझड 2006 ज्ञानदत्त प्रकाशन, पुणे. 227
कादंबरी - पानझड - प्रसिध्दी नोव्हेंबर, २००६: ज्ञानदत्त प्रकाशन, पुणे.

पानझड चा विषय लेखकाच्या लग्नापूर्वीचा. त्याच्या कॉलेज जीवनात, त्याच्या शिक्षक-प्राध्यापक जीवनात ज्या ज्या मैत्रिणी आल्या, त्यांच्या सहवासातील मोकळेपणा, जवळीकपणा ह्या पानझड कादंबरीत आला आहे. सर्वांशी प्रामाणिकपणाने वागले तर स्नेह लाभतो. प्रेम लाभे प्रेमळाला. लेखकाला असे मैत्रिणींचे जे खूप प्रेमळ प्रेम मिळाले, त्याची ही नितळ कहाणी.

058 बाभळबन 2007 चिरंजीव प्रकाशन, पुणे. 216
प्रसिध्दी 2007 चिरंजीव प्रकाशन, पुणे.

कौशीचा बाप ड्रायव्हर भाय. हिंडफि-या कुत्रा. मालट्रकला जिकडं भाडं मिळत तेथे जाणं. पुन्ना तिकडनं दुसरीकडवं भाडं मिळालं की तिकडचा गावगन्ना. घरी जलदी येण्याची गॅरेंटी नाही. मालट्रक पार पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नगर, बीड, जालना असा फेरा मारीत बसायचा. ट्रकमालक बदामरावाला फोनवरनं रिपोर्ट देत बसायचा.
"गुलब्या ड्रायव्हर लेका, ट्रक घेऊन घरला लौकर ये."
"का? काय झाले?"
"तुझी बायको पळाली पोरीला टाकून. तुझी पोर कौशी .."
"कौशीचं काय? पाच सहा वर्साची पोर. आईच्या अंगावर तर पेत नाहीती."
"गुलब्या. तू बाप्या. याच पाच सहा वर्षाच्या पोरीचा सांभाळ तू कसा करणार?"
"कौशीला माझ्यासंगती ट्रकवर नेत जाईन .. गाडीत बसून ती पळती झाडं, डोंगर, नद्या तर पाहिल .."
"गधड्या, बायकोचं पाय घरलं असतं तर .. पर जात ड्रायव्हरची तुझी. घर कंडीशन भिक्कारकी दिखाना अक्कडका!"
"मर गयी वो औरत"
"म्हंजी दुसरी बायको बघतली का?"
"बाई जातील इस्वास नाय आपला."
"लै बायकांशी खेळतोस ना म्हून तू असा बोलतोस तू बायकोबद्दल ..."
"साला बायको चांगली होती. पंढरपूर आळंदीची वारी करायची. तोंडात नेहमी रामकृष्ण हरी. पोरीच्या कपाळाला अबीर बुक्का लाव्हायची, साला आपल्याला अशी बायको काय कामाची? पळाली ते बेस झालं .. पोरीला सोबतीला नेलं असतं तर बरं झालं असतं .. एखाद्या माळवाल्यानं गायीसंगती कालवड बी सांबाळली असती .."
भगंड जिंदगी जगणा-या गुलब्या ड्रायव्हरच्या कौशी नावाच्या पोरीची ही तसलीच रंजक कथा.

 

059 खासदार 2002 पार्टनर पब्लिकेशन, विरार, ठाणे. 214
कादंबरी - खासदार - प्रथमावृत्ती २००२, द्वितीयावृत्ती २०१६ शांती पब्लिकेशन्स, पुणे.

खासदारमित्रा, एवढा पैसा आणलास कोठून?
ते ऐकलं आणि अण्णा खदखदा हसला. लेखकमित्रा, दोन वेळा आमदार होतो. आता खासदार... ह्या पंधरा वर्षात हा अण्णा काय मळकूट खादीची कापडं आणि टाचेला झिजलेली चप्पल घालून हिंडणार काय? महाराष्ट्राचे सी.एम. आणि भारताचे पी.एम.... ह्यांना मी भेटणारच ना? बड्या बड्या लोकांची कामे त्यांच्याकडून करून घेणार. सारा पैसाच पैसा... बँक अकाउंट फुल. खासदार अण्णा हे पटत नाही. पूर्वी तू जुन्नरच्या पार्टी ऑफिसात डोक्यावर लाल टोपी घालून लोकांची कामे करायचास-मी आता मुंबईत बिहारी खासदाराचा मलबार हिलचा प्लॉट घेतलाय. अण्णा लेखका, दिल्लीच्या यमुनेचं पाणी वेगळच रे...ते प्यालं की गावच्या नदीचं पाणी मचूळ वाटतं बघ... खासदार झालं की संस्थानिकांचा बाप झालोय, असं वाटतं बघ-भ्रष्ट राजकारणीचं अंतरंग उलगडून दाखविणारी भेदक कादंबरी.

060 गुलाम 2003 पायल पब्लिकेशन, पुणे. 232
प्रसिध्दी 2003, पायल पब्लिकेशन, पुणे.

"मला मुंबई आवडते. मुंबई माझं स्वप्न म्हणून मी मुंबईवाल्या प्राध्यापकाशी लग्न केलं. मी पण मुंबईलाच प्रध्यापकी करणार."
"मोहना, म्हणजे तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलेस? गावाचं फॉर्महाऊस, बागायती, शेती गावच्या कॉलेजची प्राध्यापकी हे सारं माझ्याशी तू झूट बोललीस?" देवदत्त बोलला.
"देवदत्त, ह्या डोंगरद-यात, जंगलपट्टीत ह्या आडवळणी गावात आहे काय? डोंगरच डोंगर, माती, इथली अडाणी-दरिद्री माणसं हे मला नाही आवडत. मुंबई शहर कसं .. ते मला कायमचं हवं म्हणून लग्नाआधी तुम्ही सांगाल ते मान्य केलं पण लग्नानंतर मला जे हव ते सांगतेय."
"म्हणजे मी मुंबई सोडून गावच्या कॉलेजात प्राध्यापकी केली, गावची शेती, फॉर्महाऊस मध्ये राह्यचं ठरवलं तर तू माझ्यासोबत राहाणार नाहीस?"
"मी सांगते ते ऐकायचं .."
म्हणजे आपण हिच्यासोबत गुलामासारखंच ह्या मुंबईत राह्यचं. आपलं गाव, शेती, आईवडील ह्यांना विसरायचं ... देवदत्ताला दुभंगल्यागत झालं...

Top