द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Published Books - प्रकाशित पुस्तके

 लेखक - द. स. काकडे, कादंबरी
कादंबरी क्रमांक 021 ते 040
अगोदरचे पान - कादंबरी क्र. (001 ते 020) - (021 ते 040) - (041 ते 060) - (061 ते 079) - पुढचे पान

अनु. क्र.

मुखप्रुष्ठ

पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष प्रकाशक प्रुष्ठ संख्या

021

सात एकर जमीन 1987 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 279
कादंबरी - सात एकर जमीन - प्रसिध्दी १९८७ : बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

लेखकाची ही सर्वात आवडती कादंबरी. एकत्र कुटुंबातील कुटुंब प्रमुखाने ही जमीन आपल्या बायकोच्या नावे लबाडपणे लावली. वाटप प्रकरणात महसुल कचेरीत तिच्या सातबाराचा शोध लागला. कोर्टकचेर्या हाणामार्या झाल्या. आठ वर्षे ही जमीन पडीक पडली. सात एकरात बाभळरान माजलं. निकाल लागला. खेडेगावात जमिनीसाठी लोक काय काय खेळ खेळतात ह्या खेळाचे लेखन ह्या कादंबरीत आहे. लेखकाच्या घरातीलच ही सत्यकथा असल्याने ही वास्तव कहाणी वाचून वाचक अस्वस्थ होतो. लेखकाची नाळ ह्या सात एकर जमिनीशी जोडलेली आहे, त्यामुळे तो ती विकत घेतो. सुखी माणसाचा सदरा अंगात घातल्याचा तो आनंद घेतो.

022 तांबड सांज 1989 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 217
प्रसिध्दी 1989, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

सिनेमासाठी स्विकारलेली कादंबरी.
तिनं तिच्या घराच्या चौकटीतनं आपलं संपूर्ण उदास रूप दाखवलं. ते त्याला पाहवत नव्हतं.
"क्या हो गया समिना?"
तिच्या डोळ्यातनं पाणी घळघळलं.
"देखा नही जाता समिना." तो कळवळून बोलला.
तिच्या अंगावरचा नेहमीचा फुलाफुलांच्या डिझाईनचा पंजाबी ड्रेस नव्हता. होता एक मळकट पंजाबी ड्रेस. गळ फासासाठी गुंडाळलेली जुनाट ओढणी गळ्याभोवती लटकत होती. ओढणीला असंख्य चुन्या पडलेल्या.
"समिना .. तू बोल ना .. तू बोलली नाहीस तर मी मरेन"
"शिवा, तू नाटक कर रहा है .."
"समिनाऽ"
"तेरे जैसे भोत देखे बंबयमे // आये और गये .. मै रोती रही. तू ह्या देहातमध्ये भेटलास .. सावरलं स्वत:ला. खुदको सम्हाल लिया .."
"मी आहे तुझ्यासाठी"
"ये तेरी बकवास बंद कर, शिवा." बोलताना तिचा गळा भरून आला.
"समिना, का अशी बात करतेस? तू तो मेरी दिल की रानी. तू भुललीस ती तांबड सांज .."
"शिवा, तेरी शादी जमी .. मालूम पडा मुझे .. कसम खायी थी तूने मेरे लिये .."
"असं असलं तरी .."
तिनं ते ऐकलं न गर्रकन मागं वळली. तिनं धाडदिशी दरवाजा लावून घेतला ..
दो जिवांची काळजाची धडधड वाढवणारी कहाणी.

023 खेड्यामधले घर कौलार 1989 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 254
कादंबरी- खेड्यामधले घर कौलारू- प्रसिध्दी १९७९: बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

बहारदार निसर्गाच्या पार्श्वभूमीवरील ही मस्त कादंबरी. कथालेखक लेखनासाठी खेडेगावात येतो. तेथे त्याला जे सत्य जाणवते त्याचे चित्रण लेखकाने सहजपणे केलेले आहे. खेड्यामधली दोन कौलारू घरं लेखकाने पाहिली. एक चंदामावशीचं, दुसरं फुलामावशीचं. एक स्वत:च्या गैर कर्तृत्वानं मिळवलेलं. एक शुध्द वर्तणुकीतनं मिळवलेलं. खेड्यामधलं घर कौलारू, हे ऊन पाऊस ह्या सिनेमातलं गाणं ऐकताना लेखकाला ही दोन्ही घरं दिसतात. त्यातलं फुलामावशीचं घर श्रध्दाशील वाटतं. लेखन करायला तेच घर त्याला योग्य वाटलं. घर हे पहिलं मंदिरासारखं असावं, म्हणजे तेथे कोणीही आला तरी त्याला तेथे आनंद मिळतोच, हे लेखकाने मांडलेले आहे.

024 दानपत्र 1991 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 222
सात एकर जमीन नावे असलेल्या आईला तिची मुलं आणि तिचे जावई कसे खेळवतात, दानपत्र आप्या नवे व्हावे म्हणून कशी कपट कारस्थनं करतात त्याची ही कथा.
025 माळ हा सरेना 1991 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 227

माळ हा सरेना - प्रसिध्दी १९९१- प्रिया प्रकाशन, मुंबई.

पूर्वीचे निसर्गरम्य गाव तेथील माणुसकी जपणारे लोक...सारे बदलले आहे. बेरकीपणा, संधीसाधू राजकारण आणि मतलबीपणा वाढलेला. घरातच भाऊबंदकी वाढलेली तेथे गावकीत काय? बदललेल्या खेड्याचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. ही कादंबरी लेखकाचेच आत्मचरित्र आहे. कादंबरीचा नायक मुंबईत राहून गावच्या आईवडील, भाऊ बहिणीसाठी जीव तोडतो. त्यांना सुखात ठेवण्यासाठी धडपडतो. पण शेवटी कोसळून पडतो. कवी रेंदाळकरांच्या माळ हा सरेना ह्या कवितेचे नावच लेखकाने कादंबरीला दिलेले आहे. कादंबरीभर सारा माळच पसरलेला. हिरवळ नाही. सार्या ओसाडपणाचे दु:ख ह्या कादंबरीत मांडलेले आहे.

026 कलंदर 1991 अमोल प्रकाशन हाऊस, पुणे. 175
पुस्तक प्रकाशक असलेले वडील वारले न् विश्रामच्या चार भावांनी दोनच दिवसातं "गोवेकर पब्लिशिंग हाऊस प्रकाशन संस्था"

बंद करण्याचा निर्णय घेतला. एक मजली इमारतीवरचा प्रकाशन संस्थेचा बोर्ड पण उतरून ठेवला.
"हे काय?" लेखक विश्राम चारही भावांवर ओरडला.
"आपली इमारत पन्नास लाखात घ्यायला सरदेसाई तयार आहेत." मोठा भाऊ बोलला.
"बाबांच्या प्रकाशन संस्थेनं छापलेल्या पुस्तकांचं काय करणार?"
"पुण्याचा मारवाडी पुस्तक विक्रेता ऐंशी टक्क्यानं सर्व पुस्तके घ्यायला तयार आहे." दोन नंबरचा भाऊ बोलला.
"म्हणजे रद्दीच्या भावात पुस्तके विकणार तुम्ही?"
"होय .." चारही भाऊ एका सुरात बोलले.
"अरे, ह्या पुस्तकांमध्ये महाराष्ट्र शासन, गोवा शासन एवढेच काय पण साहित्य अकादमीची पारितोषिक पुस्तके आहेत. ती पण तुम्ही लॉटच्या भावात विकणार?"
"पुस्तके खाली केल्याशिवाय सरदेसाई इमारत घ्यायला तयार नाहीत. पन्नास लाख आपण पाच जणात वाटून घेऊ .. शिवाय लॉटमधील विकलेल्या पुस्तकांचे पैसे आहेत."
"तुमची वाटणी तुम्हीच घ्या. मी अॅफिडेव्हीट करतो."
"म्हणजे तू हक्क सोडणार ह्या इमारतीवरचा.."
"नुसती ही इमारतच नाही, तर आपलं घर, नारळीबागेची शेती. सारं सारं काही .."
"पण तू राहणार कोठे?"
"मी कलंदर जिंदगी जगणार .. तुमचं व्यवहारी जग वेगळं. माझं जग वेगळं."
वेगळ्या जगात जगणा-या कलंदर लेखकावरची कादंबरी.

027 घायाळ 1993 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 224
कादंबरी - घायाळ - प्रसिध्दी १९९३: बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. दुसरी आवृत्ती अजब पब्लिकेशन्स, कोल्हापूर

सावळा आठ महिन्याचा पोटात असताना बैजूला नवर्याला महारोग झाल्याचं कळलं तेव्हा ती हबकली. नवर्याला महारोग झाल्यानं त्याचा देखणेपणा गेला, त्याच्या शक्तीलाच ग्रहण लागलं. नागराजाला अंगावर डसवून घेतला तर विषानं महारोग जाईल, असं वैदूनं उपाय सांगितला. ते ऐकून तिचा नवरा पळालाच. नागराजाच्या विषाची परीक्षा घ्यायची म्हणजे मरणच की. नवरा पळाल्यानंतर देखण्या बैजूला जे भोग आले, तिची ही घायाळ कहाणी.

028 रानोमाळ 1993 अमोल प्रकाशन हाऊस, पुणे. 160
प्रसिध्दी 1993 अमोल प्रकाशन, पुणे.

"बकुळा, तू त्या हरामी गवत्याकडं जाणार? त्यानं तुझ्या ह्या लाडक्या मोतीतात्याच्या बाजीला सोडवण्यासाठी तू त्याची रखेली हिणार?"
"हां मोतीतात्या, तूच मला लहानचं मोठं केलं. मग तुझ्यासाठी मलाही मन मोठं कराय पायजे. तुझा संसार पुन्हा उभा कराय पयजे."
"बकुळा, ज्यानं तुझी आईसारखी चुलती, बाजी पळवली ह्याची शेज रंगवून तू स्वत:चा बळी देणार?"
"हां, तात्या त्या शिवा तो गवत्या बाजीनानीला सोडणार नाही."
"बकुळा, माझा संसार मोडला. बाजी स्वत: होऊन माझ्याकडे गवत्याला सोडून आली असती तर गोष्ट वेगळी. ती आली असती तर त्या कलंकिनीला मी समदं माफ बी केलं असतं .."
"बास .. पुढं बोलू नकोस. बाजी कलंकी झाली त्यात तू का कलंकी होतेस .. इसर त्या बाजीला .."
मोत्या वडा-याच्या पायात वावधान उठलं. त्याच्या पायांत घोडदौड होती. एवढी तुफान दौडणारी बकुळा .. पण तिला टाकून मोती कितीतरी पुढं धावत होता.
मोतीमागनं बकुळा धावत होती. माळशेत घाटाचा कढा पुढं असतानाही मोती थांबला नाही. तो कितीतरी वेगाने खाली खोल दरीत कोसळला. त्याच्यामागनं बकुळा ..
माळशेत घाटात धुवॉंधार पाऊस कोसळताना. हिवाळ्यात धुके पडलेले असताना ..उन्हाच्या मृगजळाच्या लाटा उठत असताना .. कधी तरी पोर्णीमेच्या चांदण्यात .. अमावस्येच्या गर्द काजळी काळोखात कुणाला तरी ह्या दोन आकृत्या अस्पष्टपणे दिसतात.
माळशेत घाटात रानोमाळ ह्या आकृत्या धावताना दिसतात. क्षणभरानं नाहीशा होतात.

029 फिरंगी 1993 अमोल प्रकाशन हाऊस, पुणे. 166
प्रसिध्दी 1993, अमोल प्रकाशन

दुसरी आवृत्ती 2009, अजब पब्लिकेशन, कोल्हापूर.
"साहेब, मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य महत्वाचं, देशाच्या स्वातंत्र्यसाठी मी माझ्या सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे. तेथे माझ्यावर प्रेम करणा-या डॉक्टर हॅरीचं काय?"
"येस, यु आर ऑल राईट. आय अॅम प्राऊड ऑफ यू. हॅरी अल्सो प्राऊड ऑफ यू ... पण तू तिला फिरंगी म्हणायचा ते तिला आवडायचं नाही. शी टोल्ड मी .. ती स्वत:ला हिंदुस्थानी समजायची."
"साहेब, हॅरी इंग्लंडला गेली. तिला सांगा .."
"शिवा लव्हड यू ..असंच ना?"
"साहेब, तुमची मुलगी हॅरी .. माझी झाली असती तर .."
"शिवा, यू डू युवर ड्युटी .. यु शुल्ड फाईट फॉर युवर नेशन."
शिवानं त्या उदार फिरंगी अधिका-याचे हात हातात घेतले. त्याने शिवाच्या हाताचे पटापट मुके घेतले.
शिवानं पाठ फिरवली. क्रांतीकारकांच्या टोळीकडे तो घोडदौड करीत निघाला. घोडदौड करीत असताना त्याच्या पुढे घोड्यावर स्वार झालेली फिरंगी हॅरी त्याला दिसत होती ...

030 बिबळ्या 1996 सत्यजय प्रकाशन, मुंबई. 297
ठाकराची सुगी एका पायानं अधू. तिचा नवरा धर्मा. डोंगर द-यात झोपड्यात कबाडकष्ट करून जगणारं हे तरूण जोडपं.
धर्मा हाती धारदार कु-हाड घेऊन दरोडेखोरांच्या टोळीत सामील व्हायला हवा, असं सुगीला वाटायचं. पण तो तब्येतीनं दणदणीत असून बी त्याचं काळीज सशाचं. त्याच्या बापाला त्याच्या चुलत्यानं हाताच्या पंज्यात वाघनखं घालून फाडला, फरशीनं तोपला तरी तो इरशिरानं उठला नाही. कु-हाडीनं लाकडं फोडून गावात ती विकून पोट भराय लागला..
धर्माचा मामा लखमाच्या डोक्यात सुगी भरलेली. तिची शिकार करण्यासाठी तो बिबळ्यागत डोंगरद-यात फिरू लागला. सुगीला आणायच्या तेज डोळ्यानं पाहू लागला.

डोंगरद-यातल्या पार्श्वभूमीवरची रांगडी कथा.

031   काळोख 1996 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे. 168
मायबापाची सावली नसलेला हिरालाल मावशीकडे रहातो. मावशीचा नवरा मुंबईला साधा गिरणी कामगार. तिला वाटायचं हिरालालनं मुंबईला गिरणी कामगार व्हावं. पण हिरालालची स्वप्ने आभाळाला गवसणी घालणारी. त्याला बंगला गाडी हवी होती. एवढच नव्हे तर मुंबईतली एखादी कापड गिरणी मालकीची हवी होती. असा हा हिरालाल. त्याच्या जिंदगीची मजेशीर कथा म्हणजे काळोख. ह्या काळोखातून कसा उजेड पडतो, ते पहा.
032 जिंदगी 1996 राजहंस पब्लिकेशन्स, पुणे.

 

232
कादंबरी - जिंदगी - प्रसिध्दी १९९६: राजमुद्रा पब्लिकेशन्स, पुणे.
दुसरी आवृत्ती २००५: सत्यजय प्रकाशन, मुंबई.
तिसरी आवृत्ती २०१६: शांती पब्लिकेशन्स, पुणे.

कलावंतांची अनोखी जिंदगी जगणार्या कलावंताची ही दिलचस्प कहाणी. लेखकाने ही कादंबरी कवीमित्र नामदेव ढसाळ आणि मल्लिका अमरशेख यांना अर्पण केलेली आहे.

033 राही 1996 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे. 200
प्रसिध्दी 1996, चंद्रमौळी प्रकाशन, पुणे.

बैलगाडीच्या शर्यतीत भाग घेणा-या धैर्यशील राहीची चित्तरकथा. ग्रामदैवता मळगंगेच्या शर्यतीच्या घाटाखाली चार बैलांचा गाडा राहीनं उभा केला होता. तिनं तेजाला, मार्तंडाला आणि पैलवान पोरांना चार बैली गाडा व्यवस्थित सोडायला सांगितला. शिट्टी वाजल्याबरोबर बैलगाड्यापुढं निशाण हललं की टाच मारून त्याला दौडविणार होती. त्याच्या मागनं चार बैली गाडा सुटणार होता.

शिट्टी वाजली, निशाण हललं, वाजंत्र्यांनी धमाका उडवला. उसळी बार उठला, फटाके वाजले. राहीच्या घोड्याच्या दौडीमागं चार बैली गाडा वावधानात सुटला! हजारो टोप्या, फेटे, मुंडाशी, शेअले अस्मानात उडाले. गुलाल भंडार उधळला. टाळ्यांचा कडकडाट झाला. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच राहीचा बैलगाडा मळगंगेचा घाट चढून जाणार तर घोड्याचा लगाम सुटल्यानं राही घोड्यावरनं चेंडूगत उडाली न धुळीत पडली. तिचा वेगात येणारा बैलगाडा तिच्या अंगावरून गेला की काय म्हणून लोकांचा आवाज उठला. अरारा .. सा-यांच्याच काळजाचं पाणी झालं होतं. राही सुसाट येणा-या बैलगाड्याखाली चिरडून गेली काय?

राहीचा बैलगाडा तिच्या अंगावरून गेला पण पण ती वाचली. बैलगाड्यांच्या टापांखाली किंवा गाड्यांच्या चाकांखाली ती न येता ती मधीच पडल्यानं मळगंगेनं तिला वाचवलनं त्या बैलगाड्यामागनं दौडत येणा-या घोडेस्वारानं तिला धुळीतनं उचलून आपल्या पुढं बसवलनं. घोड्यामागनं दुसरा बैलगाडा वेगात येत होता.
राहीला त्या घोडेस्वारानं घाटावरती अणलं. त्याच्या डोक्यावरचा भगवा फेटा. राहीच्या डोक्यावरचा फेटा धुळीतच पडला होता. तिनं ति रूबाबदार तरूण पाहिला. "धन्यवाद .." तिने त्याला हात जोडले.
"तुला वाचवायचं भाग्य मला मिळालं .. तुला ओळखतो मी राही."
"काऽऽ यऽऽ " राही त्याला विस्मयानं बोलली.
पण ते ऐकायला तो जाग्यावर नव्हता. घोड्यावर उडी घेऊन तो आपल्या बैलगाड्याकडं दौडत गेला.
राहीच्या जिंदगीची ही वेगवान कथा वाचावी अशीच.

034 निष्पर्ण 1993 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे. 178

प्रसिध्दी डिसेंबर,1993 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे.

नाशिक जवळच्या सिन्नरच्या कोंडबा ह्या दरिद्री शेतकरी कुटुंबाची ही कथा. त्याची बायको सुरू, मोठी मुलगी सरकी, धाकटी देवकी.

देवकी देखणी, लहानपणापासून ती बोलायची नाही, आपल्याला लहानपणापासून सारे डोळें वाकडे करून पाहातात हे ती ओळखून होती. अनुभवानं मग ती स्वत:ला सर्वांपासून दूर ठेवायला लागली. पण लोक चांगले तसे वाईट. चांगल्यापेक्षा वाईटांचा अनुभव तिला खूप आला. त्याच देवकीच्या अनुभवाची ही कथा.

035 रानवारा 1997 सत्यजय प्रकाशन, मुंबई. 175
प्रसिध्दी 1994 सत्यजय प्रकाशन, मुंबई.
दुसरी आवृत्ती 2009 अजब पब्लिकेशन, कोल्हापूर - तिसरी आवृत्ती 2016 शांती पब्लिकेशन, पुणे.

देवीला सोडलेल्या गोकुळ गायीला खोंड झाला. देवीला पुत्र षाला. तो गावाचा पुत्र झाला. गोकुळाचं दूध काढण्यास बंदी. ते दूध सारं खोंडाला. खोंड सारं सैल दूध पित होता. तोंडाचा फेस गळेपर्यंत तो दूध पित होता, तरी दूध संपत नवहतं.गोकुळाचा पान्हांच तसा. दूध जमिनीवर सांडायचं. खोंड जिभेवर ते घ्यायचा. मनसोक्त दूध आणि हिरवा चारा ... त्यामुळं खोंड पुष्ट झाला. जबरदस्त झाला. गावातल्या बैलांवर तो तुटून पडायला लागला. खुंट्याला बांधलेले बैल, दावणीचे बैल यांच्यावर तो आपल्या डोक्यावरील बाकदार शिंगाचे ते दोन खंजीर दाखवू लागला. मस्तकाच्या टकरीनं त्यांना खुंट्यावरनं तुडवूनदेऊ लागला. देवीच्या खोंडाला ना दावं ना वेसण. बाकीचे खोंड बैल सारे चेसण ठोकलेले. दाव्यानं खुंट्याला बांधलेले. देवीचा खोंड त्यांना शिंगावर घेऊ लागला. रक्तबंबाळ करू लागला. ..
सा-या गावाला रंजीस आणणा-या वावधान खोंडाची जिगरबाज कथा.

036 वंश 1997 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे. 160
कादंबरी - वंश - प्रसिध्दी १९९७ : चंद्रमौळी प्रकाशन, पुणे.

अग गौरा तशी मोठ्या मनाची ग... तिला मुलाची खूप ओढ. पण मी तिला मूल देऊ शकलो नाही. म्हणून तिनं घटस्फोट घेतला. पण ती मोठ्या मनाची म्हणून तिनं घटस्फोटाचं कारण कोर्टात वेगळं दिलं... तिनं नवरा नामर्द म्हणून नव्हे तर तो बाहेरख्याली म्हणून कारण दिलं...
बस, समजल सारं... मला काही सांगू नका.
अग, गौराला माPया रक्ताचं मूल हवं होतं... पण मी... तिला दत्तक मूल घेण्याचा प्रस्ताव दिला. पण तिनं तो नाकारला, घटस्फोट घेतला तिनं कोर्टातनं. आता ती मूल नाही म्हणून वेडी झालीय. दारू प्यायला लागलीय...
तुमच्या गौराचं नाव माझ्या नव्या संसारात नकोय.
सुलू, तू गौरासारखी घटस्फोट तर घेणार नाहीस ना? वंशाला दिवा नाही म्हणून तू गौरासारखी वेडी तर होणार नाहीस ना?
एका सदवर्तनी पुरूषाची जिवाची घालमेल करणारी कहाणी.

037 पिंजरा 1999 शांती पब्लिकेशन, पुणे. 167
प्रसिध्दी 1999, राज पब्लिकेशन्स, पुणे.

सैदरानं आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली ती शंभुरावांना आपल्या कोटाच्या खिशात सापडली. त्यांनी ती वाचली आणि त्यांनी रावसाहेबांना अग्नीसंस्कारासाठी बोलविण्यास घोडेस्वार धाडला.
शंभुरावांनी ती चिठ्ठी रावसाहेबांच्या हाती दिली. त्यांनी ती चिठ्ठी उलगडली. तीर्थरूप शंभुरावांना उद्देशून ती चिठ्ठी होती.
"प्रिय बाबांस ..

साहेबरावांशी साखरपुडा होऊन लग्न मोडल्याचे दु:ख होते. पण त्यांच्याच मोठ्या बंधूंनी माझ्याशी लग्न कारण्याची जी तयारी दाखवली, त्याबद्दल खूप आनंद झाला होता. पण साखरपुडा धाकट्या भावाशी होऊन ते लग्न मोडल्यावर घरात सूनबाई म्हणून प्रवेश करणं म्हणजे माझ्यासाठी तो पाटलांचा वाडा पिंजरा झाला असता.

माझ्या आत्महत्येमुळं रावसाहेब, दु:खी होतील. म्हणतील, वेडी पोर! आम्ही लग्न करण्यास तयार असताना उगाच आत्महत्या केली. रावसाहेब, तुमच्याशी साखरपुडा होऊन माझं लग्न झालं असतं तर मी तुमच्या वाड्यात सुखानं संसार केला असता. पण मीच कमनशीबी.

माझी शेवटची एकच इच्छा. रावसाहेब तुम्ही अग्नीसंस्कारास याल तेव्हा अग्नी ज्वाळांकडे तुम्ही पाहा. तुमच्याशी मी स्मित केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यामुळेच मी आनंदाने आत्महत्येचा निर्णय घेतला." ... सैंदरा.

शंभुराज पाटील संथपणे घोडनदीच्या पाण्यात शिरले. त्यांच्या पाठोपाठ रावसाहेब पाण्यात हातपाय धुताना सैंदराच्या नाजुक हातांचा स्पर्श होतोय, असा भास होत होता.

038 मायबाप 1998 चंद्रमौळी प्रकाशन, पुणे. 184
प्रसिध्दी 1998, चंद्रमौळी प्रकाशन, पुणे.

तरूणा वहिनी विधवा झाली, लग्नानंतर अवघ्या एका वर्षात भाऊ काविळीनं गेला. तरूणा वहिनीला सांभाळण्याची जबाबदारी आमची होती. माय न बापाला मी तसं बोललो. तर माय म्हणाली,
"पहिली ती आणली होती. नवरा गेल्यावर ती आपली राहिली नाही. तिनं बापाघरी जावं."
"बापा, तू तरी सांग .."
"तुझ्या आईच्या शब्दाबाहेर मी नाही."
माझी चौदा वर्षाची बहीण समोरच बसली होती. तिला पाहून माय म्हणाली,
"तुझी बहीण लग्नाची आहे. तिचं बघ कायतरी.."
"तिचं अठरा वय झाल्याशिवाय कायद्यानं लग्न करता येणार नाह्य."
"मग ती काय करणार अठरा वर्ष होईपर्यंत?"
"ती शाळा शिकतीय. शिकू दे. वीस एकवीस वर्षापर्यंत चांगली कॉलेज पूर्ण करील, नोकरी करील. तिला आवडलेल्या तरूणासंगती तिचं लग्न करता येईल."
"मोठा शहाणा हायेस .. शिक्षणानं तिला बिघडायला ठेवणार हायेस का?"
"माझ्या बहिणीची तू नको काळजी करू. तिचं शिक्षण मी करणार. विधवा वहिनीचं काय करणार?"
"ती करील दुसरा नवरा.. " माय बोलली.
"काय?" मी ओरडलोच.
माय बाप असं का वागतात ते मला कळेनाच.
माय बाप आणि मुलगा ह्यांच्या विसंवादाची कथा.

039 केळीचे सुकले बाग 1998 शांती पब्लिकेशन, पुणे. 223
कादंबरी - केळीचे सुकले बाग - प्रसिध्दी १९९८: शांती पब्लिकेशन्स, पुणे.

लेखकाने बंगाली कादंबरीकार शरदबाबूंच्या देवदास आणि पारोस ही कादंबरी अर्पण केलेली आहे. देवदास आणि पारो ह्या एकमेकांचा ध्यास घेतलेल्या जिवांसारखीच ही एक प्रेम कहाणी. मन विव्हळ करणारी ही कथा वाचायलाच हवी.

040 जन्मपेठ 1997 राज पब्लिकेशन्स, पुणे. 360
प्रसिध्दी 1997, राज पब्लिकेशन्स

दुसरी आवृत्ती वर्ष 2000 संन्यासी - नावे -मेघना प्रकाशन, पुणे.
वेताळ मंदिरातील तिचा संन्यासी नवरा बाहेर आला. त्याच्या पावलावर जाऊन ती कोसळली.
संन्याशानं बायकोची एकंदर परिस्थिती ओळखली. हिच्या पापाचरणामुळे आपण गृहत्याग केला. संन्यासी झालो. आता हिला पश्चाताप झाला म्हणून ही आपल्या पायावर कोसळतेय.
त्यानं बाजूलाच पडलेला अजगर उचलला न तिच्या अंगावर फेकला. त्याच्या सळसळणा-या जिभेकडे पाहून ती किंचाळली, ".. हे ..हे.. काहय?"
"तुला मी माझ्या पती बंधनातून मुक्त केलंय .. तू मुक्त आहेस..."
"प .. प.. पण हा अजगर .. मला तो गिळून टाकील .."
"तो तुला काही करणार नाही... उठ तू ..चालू पड.. आजपर्यंत तू जे अनितीचं पापाचरण करीत होतीस, त्याचं प्रायश्चित्त म्हणून तू जन्मठेपेची शिक्षा भोगत फिरशील... अश्वत्थामा चिरंजीव होता .. पण त्याला चिरंजीवपणाचं सुख मिळालं का? तसंच तुला जिवंतपणाचं सुख मिळणार नाही.. फाशीचा कैदी फाशी दिला तर मरतो. पण जन्मठेपेचा कैदी..!"
सदाचरणाचा संदेश देणारी कादंबरी.

Top