|
"कादंबरी क्षेत्रातील बापमाणूस"
कुकडीचे पाणी : द. स. काकडे
भायखळा भाजी मार्केटमध्ये एक भाजीवाला 'साप्ताहिक स्वराज्य' अंकातील कथा वाचत होता.
लेंगाशर्ट घातलेला, मिसरूडही न फुटलेला एक मुलगा त्याला म्हणाला, 'तुम्ही जी कथा
वाचताय ती मी लिहिलेली आहे.' आचार्य अत्रेंसारखे मोठे आणि भारदस्त लेखक पाहिलेला तो
भाजीवाला चमत्कारिक हसून 'बाळा.. पुढे जा' असं म्हणाला. खजिल झालेला तो मुलगा
शांतपणे निघून गेला. याच मुलाने पुढे दोनशेहून अधिक कांदबरींचे लेखन केले. 'लेखकाने
लिहीत रहावे. लिहीण्याचा आनंद घ्यावा, कारण लेखन हेच त्याचं खरं सुख असतं' हेच या
वाचकप्रिय लेखकाचं आयुष्यभर जीवनतत्व राहिलं. एक बहुप्रसवी लेखक म्हणून नावारूपाला
आलेले हे लेखक म्हणजे जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावचे श्री. दत्तात्रय सदाशिव
काकडे होय. मराठी साहित्यात ग्रामीण साहित्याचा बाज प्रस्थापित आणि लोकप्रिय
करण्याचा यशस्वी प्रयत्न द. स. काकडे यांनी केला. वेगवेगळ्या आठ टोपण नावांनी आणि
विशेषतः स्त्री लेखिकांचे नाव घेऊन लेखन करणारा द. स. काकडे यांच्यासारखा दुसरा
साहित्यिक शोधूनही सापडणार नाही.
द. स. काकडे यांचा जन्म १५ जुलै १९४३ रोजी पिंपळवंडी, जुन्नर येथे एका सधन शेतकरी
कुटुंबात झाला. भरपूर शेती, बैल - बारदाना, चार सहा खंडी मेंढ्या, शेतात राबणारे
सालगडी आणि घरात पन्नास माणसं असलेल्या या कुटुंबातील सदाशिवचा मात्र मुंबईत
घासलेटचा मोठा धंदा होता. त्याकाळी स्वत:च्या मालकीच्या चार मोटार गाड्या असलेला हा
'घासलेटवाला शेठ' शिवडीच्या बैलगाडी आड्डयातील एका चाळीत बायको विठाबाई अन् मुलांसह
रहात होता. लाईट नसलेल्या चाळीच्या या खोलीत रात्री घासलेटच्या मोठ्या वातीच्या
बत्त्यांच्या उजेडात सदाशिव फरशीवर चांदीच्या रुपयांच्या चार - चार पिशव्या खाली
करायचा. प्रामाणिक, कष्टाळू, विश्वासू, निर्व्यसनी, पान, तंबाखू, विडीही माहिती
नसलेल्या सदाशिवची अंधेरी खोली म्हणजे खजिना गुहाच होती. चांदीच्या रुपयांची नाणी
मोजता मोजता तिथेच आडवा होणारा सदाशिव अन् त्याचं कुटुंब ख-या अर्थाने वैभवात लोळत
होते. सद्गुणी, सरळमार्गी सदाशिव सर्वांनाच चांगलं समजायचा, विश्वास ठेवायचा आणि
पुन्हा पुन्हा स्वतःचाच विश्वासघात करून घ्यायचा. अशातच सदाशिवच्या दोन मुली वत्सला
आणि गंगा लहान वयातच देवाघरी गेल्या.
मोठा मुलगा किसनचं अठरा वय पूर्ण झाले की लायसन्स काढून बापाच्या घासलेट गाडीवर
ड्रायव्हर व्हायचं स्वप्न होतं. तोपर्यंत शाळेत फारसं डोकं नसलेल्या किसनला आणि
पिंपळवंडीत नवीनच सुभाष विद्यामंदिर हे हायस्कूल झाल्याने हुशार, चुणचूणीत असलेल्या
दत्तुला सदाशिवने गावी कुटुंबात ठेवले. मूळातच तब्येतीने दांडगा असलेला किसन गावच्या
वातावरणात चांगलाच भरावला. पैलवान म्हणून आजूबाजूच्या गावातील जत्रेत कुस्त्यांचे
आखाडे गाजवू लागला, चांगलाच रमला आणि त्याचे लग्नही झाले. स्वतःची इच्छा नसतानाही
गावी राहिलेला आणि शाळेत अतिशय हुशार असलेला दत्तु म्हणजे पैलवानाचा जीव का प्राण
होता. दिवसभर मेंढरांमागे ओढ्याखोड्याला पाणी पिणा-या पैलवानाला काविळीची बाधा कधी
झाली कळलेच नाही. लग्न होऊन एक वर्ष व्हायच्या आतच पोटात काविळ उतरली अन् किसन
अंथरुणाला खिळला तो परत उठलाच नाही. जीवापाड प्रेम करणा-या भावाच्या अचानक जाण्याने
धास्तावलेल्या दत्तुने दहावीनंतर मुंबईला पलायन केले आणि बापाला, 'मी शाळेला गावी
जाणार नाही, नाहीतर आत्महत्या करीन' असे निक्षून सांगितले. लहानपणीच वाचन,
पाठांतराची प्रचंड आवड असलेल्या दत्तुला खूप शिकावे, प्राध्यापक व्हावे, मोठा लेखक
व्हावे असे वाटायचे.
वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर एस.एस.सी. पहिल्या बॅचचा
पहिला आलेला विद्यार्थी म्हणून शाळेच्या मेरीट लिस्ट बोर्डवर दत्तात्रय सदाशिव काकडे
हे नाव कायमचे लिहिले गेले. अनंत काणेकर, रमेश तेंडुलकर अशा साहित्यातील नामवंत
प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभेल म्हणून दत्तुने सिद्धार्थ महाविद्यालयात कला शाखेत
प्रवेश घेतला. इथेच १९६३ साली दत्तुने लिहीलेली 'लग्न' नावाची पहिली कथा 'साप्ताहिक
स्वराज्य' मध्ये प्रकाशित झाली. प्रकाशित कथेचा अंक आणि मानधनाची मनीऑर्डर पोस्टमनने
ऑफिसमध्ये आणून दिली आणि दत्ता काकडे हा विद्यार्थी संपूर्ण काॅलेज व
प्राध्यापकांच्या कौतुकाचा विषय झाला. पाठोपाठ दत्तुची 'माणुसकी' नावाची दुसरी कथाही
'साप्ताहिक स्वराज्य' मध्ये प्रकाशित झाली. या दोन कथा प्रकाशित झाल्यावर दत्ता
काकडे मराठी ग्रंथ संग्रहालयात ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, बाबुराव अर्नाळकर,
व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, ग. दि. माडगुळकर अशा दिग्गज साहित्यिकांच्या
साहित्य वाचनात पूर्णपणे बुडून गेला आणि परिक्षेचे भानच राहिले नाही. हातात फारसा
वेळ नसल्याने परिक्षा दिली तर निकाल काय लागणार याचा अंदाज आल्याने सिद्धार्थ
काॅलेजमध्ये तोंड दाखविण्याचे धाडस दत्ताला झाले नाही.
बापाला पास झाल्याचे सांगितले आणि फीसाठी पैसे घेऊन दत्ताने रूपारेल कॉलेजला प्रवेश
घेतला. एक वर्ष वाया गेल्याने वाचन, लेखन बंद करून दत्ता काकडे झटून अभ्यासाला लागला.
कॉलेजच्या नोटीस बोर्डवरील सूचनेनुसार नाशिक येथील 'गावकरी' दिवाळी अंक
आंतरमहाविद्यालयीन कथा स्पर्धेत दत्ताने अगोदरच लिहिलेली 'सासुरवाशीण' ही गावाकडील
सूनेच्या सासुरवासाची ग्रामीण कथा पाठवली. महाराष्ट्रातील सर्वच नामवंत काॅलेजांचा
सहभाग असलेल्या या कथा स्पर्धेत दत्ताला पंचाहत्तर रुपये बक्षिसासह प्रथम पारितोषिक
मिळाले. रूपारेल काॅलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी द. स. काकडे, इंटर आर्टस्,
गावकरी दिवाळी अंक - १९६६ आयोजित 'आंतरमहाविद्यालयीन कथा स्पर्धेत प्रथम पारितोषिक'
असा अभिनंदनाचा बोर्ड पहायला विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. इंटर आर्टस् परिक्षा
संपल्यानंतर हार्नियाने त्रस्त झालेल्या बाप सदाशिवचे दत्ताने ऑपरेशन करून घेतले.
छोटा भाऊ शिवा शाळेकडे दुर्लक्ष करून सारखा बापाच्या घासलेट गाडीकडे पळायचा.
हार्नियाने बेजार झालेल्या बापाचा धंदा सांभाळील म्हणून दत्ताने शिवाला थांबवले नाही
पण एकदा त्याच्या खिशात हात घातला तर तंबाखू पुड्या, पान तंबाखू मिळाली. दत्ताने
त्याला चांगलेच फटकारले तर तो ओशाळ हसला अन् 'मला माफ कर' बोलला.
इंटर आर्टस् पास झाल्यावर शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे यांनी ओतूरचे कर्तेधर्ते
पुढारी श्रीकृष्ण तांबे यांना विनंती पत्र लिहिले आणि चैतन्य विद्यालयत द. स. काकडे
यांची अध्यापनासाठी शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. परंतु घरची परिस्थिती चांगली
असल्याने बी.ए. एम. ए. करून काॅलेजला प्राध्यापक आणि लेखक होण्याची प्रबळ इच्छाशक्ती
आठवडाभरातच त्यांना पुन्हा मुंबईला घेऊन आली. रूपारेल काॅलेजला बी.ए. ला प्रवेश
घेतला आणि प्रा. गंगाधर नेर्लेकर, प्रा. ल. गो. जोग, प्रा. राम कापसे, माजी आमदार
अशा दिग्गजांचा सहवास द. स. काकडेंना लाभला. आता नवयुग, किर्लोस्कर, चित्रकार
दिनानाथ दलालांचा दिपावली, आचार्य अत्रे यांच्या मराठातून दसकाकडे नियमितपणे कथा
लिहू लागले होते. एके दिवशी प्रकाशक वा. वि. भट यांचे कथासंग्रहाची मागणी करणारे
पत्र द. स. काकडेंना मिळाले. हा लेखक पन्नाशीतील असावा असा अंदाज असणा-या
प्रकाशकांसमोर पंचवीशीतील पोरगेसे द. स. काकडे स्वतःच्या कथा घेऊन उभे राहिले
तेंव्हा आश्चर्यचकित होऊन वा. वि. भटांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. या
कथासंग्रहाला अभिनव प्रकाशनच्या वा. वि. भट यांनीच 'मु-हाळी' हे नाव सुचवले आणि द.
स. काकडे यांचा दर्जेदार ग्रामीण कथांचा पहिला कथासंग्रह १५ जुलै १९७० रोजी
प्रकाशित झाला.
सासुरवाशीण, मु-हाळी, कणव अशा दर्जेदार कथांच्या संग्रहाची 'ग्रामीण स्त्रीच्या
आभाळभर दु:खास' ही अर्पणपत्रिकाच वाचकांना आकर्षित करून गेली. हार्नियाबरोबरच
मूळव्याधीचाही त्रास होत असल्याने सदाशिवने एके दिवशी अचानक तेही ऑपरेशन करून घेतले.
आता बापाचे घासलेटच्या धंद्यावर जाणे बंदच झाले होते. याचवेळी बिन लायसन्सची गाडी
चालवणाऱ्या शिवाचं व्यसन, बाहेरचं खाणं, सततचा येणारा खोकला, पडणारा कफ त्याला टी.
बी. पर्यंत घेऊन गेला. अगोदर शिवडी टी. बी. हाॅस्पिटल आणि नंतर घाटकोपरला सर्वोदय
हाॅस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर आजारी बाप, शिवा, आई - बहिणीसह गावची मोकळी हवा
खायला गेले. इथून पुढे लेखक द. स. काकडे यांची फारच ससेहोलपट सुरू झाली. घरच्या
वैभवाला उतरती कळा लागली. बापाच्या घासलेट धंद्यातील काहीही हातात पडेनासे झाले.
गावी दोन पेशंट, बी. ए. चे शिक्षण आणि अभ्यास, पैशांची चणचण, एकटाच असल्याने रोजच्या
जेवणाचा प्रश्न, कधी फक्त आम्लेट पाव, तर कधी डाळ खिचडी, कधी नुसतंच पाणी पिऊन
झोपायचं. आता नोकरी करत शिकण्याशिवाय पर्याय नव्हता.
बी. ए. पास झाल्यावर एसएससीच्या पहिल्या बॅचचा पहिला आलेला विद्यार्थी असलेल्या
वडाळ्याच्या ज्ञानेश्वर विद्यालयात द. स. काकडेंनी शिक्षक पदासाठी अर्ज केला.
पहिल्या आलेल्या आणि लेखक असलेल्या दसकाकडेंना संस्थेने आनंदाने नियुक्तीपत्र दिले.
शाळा सुरू झाल्यावर दसकाकडेंनी एम.ए. ला प्रवेश घेतला आणि आईबापांनी बहिण कांताचं
लग्न ठरवले आहे असा निरोप दिला. भाऊ शिवाचा टी. बी. आटोक्यात येण्याऐवजी तो
दिवसेंदिवस खंगतच गेला. बापही मुंबईला येऊन धंदा हातात घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता,
त्याच्या भोळ्या भाबड्या गुणी स्वभावाचा सर्वांनी गैरफायदा घेतला होता पण काहीही
बोलता येत नव्हते. घासलेटच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या दिसू लागल्या, ड्रायव्हरांना
कायमची सुट्टी देण्यात आली, धंदा पार डुबला तरी घासलेटवाल्या शेठने मुंबईला वळून
पाहिले नाही. चार - चार महिने शाळेचा पगार व्हायचा नाही. उधार उसनवारी करून लेखकाने
बहिणीचे लग्न उरकले पण ते भावाला बरं करू शकले नाहीत, शिवाने जगाचा निरोप घेतला.
नियमितपणे पगार देणा-या शाळेचा शोध घेत अगोदर परेलची सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल आणि
नंतर ताडदेवची भाऊसाहेब हिरे विद्यालय, जोडीला रात्रशाळेत अध्यापन असा दसकाकडेंचा
प्रवास घडत राहिला.
आतुन बाहेरून टेकू लावलेल्या शिवडीच्या गाडीअड्डा चाळीतील लाईट नसलेल्या खोलीत जीव
मुठीत धरून दसकाकडे या लेखकाचा सुरवातीला एम. ए. आणि नंतर बी. एड. चा अभ्यास सुरू
होता. बाजूच्या रेल्वे रूळावरून मालगाडीचे डबे जाताना हलणा-या या चाळीत घासलेटवाल्या
शेठच्या मुलाला बत्तीच्या घासलेटसाठी वाण्याकडे जावे लागत होते. फक्त झोप आणि
अंघोळीसाठी या खोलीत जाणारे दसकाकडेंची पुस्तके, कपडे आणि कधी कधी रात्री झोपेत
पायही उंदीर घुशी कुरतडत होते. अशा कठीण परिस्थितीतही किर्लोस्कर, दिपावली, मराठा
या अंकातून कथालेखन नियमितपणे सुरू होते. लेखकाला लग्नासाठी अनेक प्रतिष्ठित घरातील
मुलींकडून विचारपूस केली जात होती. बोरी साळवाडी येथील श्री. मारुती काळे यांच्या 'चांगुणा'
या कन्येबरोबर पुढे 'शारदा' दसकाकडे यांचा १० मे १९७३ रोजी विवाह झाला. कुटुंबातील
वाद कोर्ट कचेरीपर्यंत जाऊन वाटप झाले होते. घासलेटचा धंदा बुडाला तरी सेल टॅक्स आणि
मोटारगाड्यांचा आर. टी. ओ. टॅक्स न भरल्याने बापाच्या सदाशिव काकडे नावाने
जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेली जप्ती नोटीस दसकाकडेंच्या हातात पडली. एका
संकटातून पाय बाहेर काढला की दुसरं संकट समोर उभे रहात होते. तपासाअंती मोटारगाड्या
कुर्ला येथे भंगारात विकल्याचे आर. टी. ओ. कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले
व टॅक्स माफी मिळविण्यात दसकाकडेंना यश आले. परंतु सेल टॅक्स मात्र त्यांना
हप्त्याहप्त्याने का होईना भरावाच लागला.
पत्नी शारदाच्या रूपाने घराला घरपण देणारी सुखसोबती लाभली ही जमेची बाजू होती.
प्रकाशक वा. वि. भट यांनी १९७७ साली दसकाकडे यांची 'सारा जन्म उन्हात' ही पहिली
कादंबरी प्रकाशित केली आणि 'लेखक दसकाकडे' हे नाव प्रत्येक मराठी वाचकापर्यंत पोहचले.
प्रकाशक वा. वि. भटांनीच 'मु-हाळी' आणि 'सारा जन्म उन्हात' ही दोन्ही पुस्तके राज्य
पुरस्कारासाठी पाठवली पण पुरस्कार लाभला नाही. पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख दसकाकडे
यांच्यापेक्षा वा. वि. भट यांनाच जास्त झाले. राज्य पुरस्कार कमिटीच्या एका सदस्याने
दोन्ही पुस्तकांची तोंडभरून स्तुती केली पण पुरस्कारासाठी इतरही काही गोष्टी कराव्या
लागतात असे खासगीत सांगितले. दसकाकडे काही काळ दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश
अध्यक्षही राहिले. पँथर नामदेव ढसाळ, राजा ढाले, राम उगावकर, शाहीर विठ्ठल उमप
यांच्याशी त्यांची मैत्री झाली. 'सारा जन्म उन्हांत' या कादंबरीनंतर दसकाकडे यांनी
झपाटल्यासारखे कादंबरी लेखन केले. प्रकाशकाच्या मागणीप्रमाणे कादंबरी लेखन होऊ लागले.
कधी कधी पाच दिवसांत एक कादंबरी असे एक टाकी लेखन दसकाकडे करत. ग्रामीण स्त्रीचे
दु:खं, एकत्रित कुटुंब, शेतकरी, सहकारी संस्था, सरकारी कचे-या, निवडणूका असे त्यांचे
लेखनाचे ग्रामीण विषय असत.
सात एकर जमीन, माळ हा सरेना, सारा जन्म उन्हांत, दानपत्र, रात्र अर्धी..चंद्र अर्धा,
रानोमाळ, केळीचे सुकले बाग, बापलेक, खासदार, बाभळबन, डागळलेली कैरी, निवडणूक,
लोकनेता, मायलेकी, वावधान, अंत्ययात्रा, खेड्यामधले घर कौलारू, घरभेदी, वंश,
स्त्रीजन्म, तांबडसांज, रानवारा अशा दोनशेहून अधिक वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या
कादंबरीचे लेखन दसकाकडे यांनी केले. चित्रकार ग. तु. बांदोडकर यांनी ज्योती
प्रिंटर्सचे मालक अशोक मेंगजी यांची दसकाकडे यांना ओळख करून दिली. फिल्म इंडस्ट्री,
महालक्ष्मी रेसकोर्स, फाईव्हस्टार हाॅटेल असा सर्वत्र मुक्त संचार असलेल्या
मेंगजींबरोबर घनिष्ठ मैत्री झाल्यानंतर अशोक मेंगजीं - दसकाकडे जोडनावाने लिहीलेल्या
आठ कादंब-यांना वाचनालयात वाचकांची तुफान मागणी आली. बांदोडकरांच्या प्रिया
प्रकाशनने दसकाकडे यांच्या दीडशेहून अधिक कांदबरीचे प्रकाशन केले. मराठी साहित्यात
वेगळा पायंडा सुरू करणा-या या जोडीला चित्रकार बांदोडकर मराठीतील सलीम - जावेद
म्हणत. बांदोडकरांच्या सूचनेवरून दसकाकडेंनी टोपन नावाने लिहायला सुरुवात केली.
वेगवेगळ्या आठ त्यातही बहुतांश स्त्रीयांची माया साठे, रजनी शिरोडकर, गीता मंगेशकर
अशा नावांनी दसकाकडे यांनी लेखन केले. लेखन हा व्यवसाय होऊ शकतो हेच त्यांनी सिद्ध
केले.
दसकाकडे यांच्या 'मु-हाळी' कथेला अधिकारी ब्रदर्सने त्यांच्या दुरदर्शनवरील
गाजलेल्या 'बंदिनी' मालिकेत स्थान दिले, दुरदर्शन, सिनेमासाठी त्यांना लेखनाच्या
अनेक संधी आल्या पण चंदेरी दुनियेपासून दूर राहणेच त्यांनी पसंत केले. जयवंत दळवी
यांनी 'खेड्यामधले घर कौलारू' ही कादंबरी वाचून दसकाकडे यांना पत्र पाठवून प्रशंसा
केली. त्यांनी कधीही कोणत्याही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केला नाही. नारायण सुर्वे,
जयवंत दळवी, आनंद यादव, व. बा. मोधे अशा मोजक्या साहित्यिकांशी त्यांचा स्नेह राहिला.
दिखाऊपणा, चमकोगिरी, शहरी लेखकांशी, समिक्षकांशी हातमिळवणी करून राज्य पुरस्कार,
साहित्य पुरस्कार पदरात पाडून घेण्याचा दरिद्रीपणा दसकाकडे यांनी कधीच केला नाही.
आजही त्यांची सतत आठ तास बैठक मांडून लेखन करण्याची क्षमता आहे. त्यांच्या वैयक्तिक
आयुष्यात छोट्या मोठ्या संकटाची मालिका दिर्घकाळ सुरूच राहिली. सुरवातीला कल्याण,
नंतर विक्रोळी कन्नमवार नगर आणि आता जवळपास चाळीस वर्षे शिवाजी पार्क, दादर असा
काकडे कुटुंबाचाही प्रवास झाला पण पत्नी शारदा काकडे यांची वैयक्तिक आणि
साहित्यिकीय जीवनात दसकाकडे यांना मोलाची साथ लाभली. दसकाकडे यांनी लिहिलेला
प्रत्येक शब्द न् शब्द पत्नी शारदा काकडे या नजरेखालून घालतात, आवश्यक तिथे दुरुस्ती
सुचवतात.
सन १९०३ साली दसकाकडे उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. जुन्नर तालुक्याने
मात्र या लेखकाची योग्य दखल घेतली आणि २०१९ साली दसकाकडे यांचा 'शिवनेरीभूषण'
पुरस्काराने यथोचित सन्मान केला. लेखक द. स. काकडे यांना समजून घ्यायचं असेल तर
त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले 'कुकडीचे पाणी' हे आत्मचरित्र वाचणे आवश्यक आहे.
कुकडीचे पाणी हे फक्त दसकाकडे यांचे आत्मचरित्रच नाही तर 'सद्गुण हाच दोष' घेऊन
शापित जीवन जगलेल्या भोळ्या भाबड्या बापाची करूणादायी कहाणी आहे... नव्हे नव्हे
दु:खं कसे सहन करावे यांचं मार्गदर्शन करणारा 'अनमोल ग्रंथ' आहे. प्रचंड दु:खातही
लेखक दसकाकडे डगमगले नाहीत, कधीही बापाला दोष देऊन दुखावले नाही उलट त्यांचे सर्व
लाड पूर्ण केले. शांतपणे परिस्थितीला सामोरे जात राहिले. कारण त्याचं तत्वज्ञानच
होतं 'लेखकाने लिहीत रहावे, लिहीण्याचा आनंद घ्यावा, कारण लेखन हेच त्याचं खरं सुख
असतं'.
विशेष सूचना - कोणत्याही लेखाच्या मूळ लेखकाचे नाव डिलीट करून किंवा त्या लेखाखाली
आपले नाव काॅपी पेस्ट करून ती पोस्ट शेअर करणे कायदेशीर सायबर गुन्हा आहे.
~ लेखक ~
संजय वसंतराव नलावडे
धोलवड, मुंबई
मोबाइल - ८४५१९८०९०२
"निसर्गरम्य जुन्नर-भूमी गुणीजणांची" |
|