द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Published Books - प्रकाशित पुस्तके

 लेखक - द. स. काकडे, कथा

 

अनु. क्र.

मुखप्रुष्ठ

पुस्तकाचे नाव

परिक्षणे

 
  001

मु-हाळी

द. स. काकडे यांच्या मुर्हाळी कथासंग्रहावरील काही परिक्षणे-

१) मराठा-रविवार पुरवणी-२७ डिसेंबर, १९७०:संपादक-आचार्य अत्रे
मुर्हाळी - हा द.स.काकडे यांचा रगेल अशा ग्रामीण कथांचा पहिला वहिला संग्रह. या कथासंग्रहातील ग्रामीण शब्दांचा समावेश कोणत्याही छापील शब्दसंग्रहात आढळणार नाही. एखादा शब्द सापडलाच तर त्या शब्दाची काकडे यांना हवी असलेली छटा तो शब्दकोश सांगू शकणार नाही. द.स.काकडे ह्या समर्थ कथाकाराने लिहिलेली ही रगेल कथा मराठी कथावाङमयात आपले वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करून राहिलेली आहे.

२) माणूस - साप्ताहिक १४ ऑक्टोबर, १९७०: समीक्षक सौ.पुष्पा भावे
द.स.काकडे यांचा मुर्हाळी कथासंग्रह प्रादेशिक वातावरणाच्या कक्षेतील असूनही तो साचेबंद ग्रामीण कथेसारखा निर्जीव झालेला नाही. कारण त्यांना स्वत:ची स्वतंत्र अशी कथाशैली लाभलेली आहे. हा कथासंग्रह वाचत असताना लेखकाच्या पुढील कथालेखनाविषयी ग्रामीण अथवा प्रादेशिक संदर्भनिरपेक्ष कथा म्हणून अपेक्षाही निर्माण झाल्या आहेत.


३) शिवनेर- २३ ऑक्टोबर, १९७०: संपादक-विश्वनाथराव वाबळे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बी.ए.ऑनर्स झालेले सत्तावीस वर्षाचे दत्तात्रय सदाशिव काकडे यांनी लिहीलेल्या ग्रामीण स्त्रीच्या आभाळभर दु:खाचा १४कथांचा मुर्हाळी हा कथासंग्रह. लेखक जुन्नरचे असल्याने थेट जुन्नरी भाषेत गोष्टी लिहीलेल्या आहेत. मराठी शारदेच्या मंदिरात काकडेंची कथा गुण्यागोविंदाने नांदेल आणि सदाशिव काकड्यांच्या पोराचा साहित्यप्रांत सुखाचा करील हीच आमची सदैव सदिच्छा!

४) महाराष्ट्र टाईम्स रविवार आवृत्ती २४ जानेवारी, १९७१:
द.स.काकडे ह्या नवोदीत कथाकाराला मुर्हाळी हा कथासंग्रह चांगल्या ग्रामीण कथाकारांच्या रांगेत सहजपणे स्थान मिळवून देण्याइतपत सरस उतरलेला आहे.

५) नवाकाळ - २७ डिसेंबर १९७०
द.स.काकडे यांचा मुर्हाळी ग्रामीण कथासंग्रह खूपच अपेक्षा उंचावणारा आहे. कथासंग्रहातील जीवन दर्शन प्रत्ययकारी आहे.

६) धनुर्धारी मासिक ऑक्टोबर, १९७०: वामन होवाळ
ग्रामीण स्त्रियांची दु:खे अनेकांनी रेखाटली असतील - आहेतही, पण त्या छटांपेक्षा काकड्यांनी कथन केलेल्या स्त्री दु:खाच्या छटा काही वेगÈयाच. द.स.काकडे ह्या तरूण ग्रामीण लेखकाचा श्वास ग्रामीण स्त्रिच्या दु:खात अडकल्याने ह्या कथा प्रत्ययकारी झालेल्या आहेत. हा तरूण दमदार लेखक भावी काळात उल्लेखनीय यश प्राप्त करील ह्याची खात्री वाटते.

७) साहित्य सहकार मासिक - ऑक्टोबर, १९७०: वि. वा. हिरे
मुर्हाळी कथासंग्रहातील १४ कथा म्हणजे १४ रत्ने आहेत. प्रत्येक कथेचा वेगवेगळा पैलू पाहावयास मिळतो. गडात, भिल्डक, दन्हारली, गाडग्याचं चाक, फिराडू कितीतरी अनोख्या शब्दांची उधळण दिसते. हे शब्द दुर्बोध वाटले तरी लेखकाचे शब्दांविषयीचे इमान व प्रेम स्पष्ट करते. मायमराठीच्या दरबारातली मुर्हाळीची हजेरी दमदार झालेली आहे.

८) तरूण भारत - रविवार आवृत्ती १३ सप्टेबर, १९७०
ग्रामीण स्त्रीचे आभाळभर दु:ख द.स.काकडेंनी मुर्हाळी कथासंग्रहात उत्कटतेने रेखाटले आहे. बाप नवरा यांच्या वादात भाजून निघालेली राही (कथा - शेंदरी आंबा) सासर्याच्या हटवादीपणामुळे उर फुटेपर्यंत कष्टणारी सून (कथा - सासुरवाशीण) सासर माहेरची अब्रू जपण्यासाठी मुकाटपणे विहीरीचा तळ शोधणारी सगुणा (कथा - सुटका) असुरी अतृप्त भुकेला बळी पडलेली नवी नवरी (कथा - डागवलेली कैरी) . .. सर्वच कथा काळीज पोखरून काढणार्या. स्त्री ग्रामीण जीवनाची ओळख करून घ्यायची ज्यांना इच्छा असेल त्यांनी ह्या कथा जरूर वाचाव्यात.

९) आलोचना - समीक्षाप्रधान अंक - जून, १९७१
द.स.काकडे यांची कथा खरीखुरी ग्रामीण आहे. म्हणजेच तिच्यामध्ये ग्रामीण कथेचा गाभा असलेली अनुभवांची क्रियाप्रतिक्रियात्मक साखळी आणि भाषासंदर्भादि बाह्य गोष्टी हे दोन्ही घटक आहेत. त्यांचा परस्पर मेळ चांगला झालेला आहे. मुर्हाळीतील ग्रामीणत्व हे प्रामुख्याने मुके दु:ख आणि दारिद्य्र यांच्या परस्पर विणीतून बांधले गेलेले आहे.

१०) मुर्हाळी - प्रस्तावना - ल. ग. जोग
द.स.काकडे यांच्या वाङमयीन दीर्घ प्रवासाची मुर्हाळी ही केवळ पेरणी आहे. ते जसजसे नवनवे अनुभव घेतील तसतसे त्यांचे लेखन तरल व विस्तारलेले होत जाईल असा माझा ठाम विश्वास आहे.

  002 गोरी मेहुणी

गोरी मेहुणी - कथासंग्रह प्रसिध्दी १९८२

मानवी भावभावनांचा वेध घेणारा हा कथासंग्रह वाचकांच्या चांगलाच पसंतीस पडला.
 

  003 रात चांदणी रातचांदणी - प्रसिध्दी डिसेंबर, १९९६

कथाकादंबरीकार जयंत दळवी यांच्या अनोख्या स्मृतींस हा कथासंग्रह लेखकाने अर्पण केलेला आहे. सर्वच कथा वेगवेगळा आनंद देणार्या.

  004 कुकडी काठच्या कथा

कुकडीकाठच्या कथा - प्रसिध्दी मार्च, १९९८
समीक्षक प्रा. डॉ. भास्कर शेळके

वर्गहीन - वर्णहीन दलित शोषितांच्या आभाळभर दु:खास कथाकाराने हा कथासंग्रह अर्पण केलेला आहे. जुन्नर तालुक्यातील कुकडीकाठच्या प्रदेशाची पार्श्वभूमी कथांना लाभली असली तरी अन्य प्रदेशातही अशा प्रकारचे जीवनानुभव येऊ शकतात म्हणून ह्या कथासंग्रहाला प्रादेशिकतेच्या चौकटीत बसविण्यात अर्थ नाही. कुठल्याही चळवळीच्या झेंड्याखाली न येता द.स.काकडे हे कथाकार म्हणून तटस्थपणे लेखन करीत असल्याचे दिसते. एकूण २० कथांचा संग्रह.

स्वातंत्र्योत्तर काळातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातील दैन्याचे चित्रण पंधरा ऑगस्टचा दिस ह्या पहिल्याच कथेत समर्थपणे रेखाटले आहे. कथानिवेदन करणारा स्वातंत्र्यसैनिकाचा पोरगा कथेत आपल्या शाळेतील झेंडावंदन करताना म्हणतो - पाठीमागे फाटलेल्या चड्डीतून बाहेर पडलेल्या माझ्या गरीबीच्या झेंड्याला फडकावत कसातरी उभा होतो. एक पाणवठा कथेत शासनाच्या विकास योजनांचा बोजवारा कसा उडाला याचे प्रातिनिधीक चित्रण आहे. रक्त कथेत जन्म देणार्या आईवडिलांपेक्षा धनिक - श्रीमंत अशा नव्या सग्यासोयरांना जवळ करणारी पिढी यांच्यातील संघर्ष अभिव्यक्त होतो. गटारी अमोशा सारख्या कथेतून गावातील चांडाळ चौकडीचा बेरकीपणा द.स.काकडे चित्रित करतात. तांबडी माती तून पैलवानाच्या रणदार तयारीचे चित्रण आहे. भोग वेगÈया वळणाची कथा आहे. हेडी रांगड्या भावाचं चित्रण करते. मुके दु:ख कथा मुक्या तरूणासोबत विवाह झालेल्या तरूण स्त्रीची कथा काळजात कालवाकालव करते. हुंदका मध्ये आणीबाणीच्या काळातील कुटूंबनियोजनाचा बोजवारा कसा उडाला ह्याचे भेदक चित्रण करते. कुंकू कथा व्यसनाधिनता, बुवाबाजी आणि स्त्रीच्या पतीनिष्ठेचे नव्हे तर तिच्या रौद्र रूपाचे चित्रण करते. सारांश - कुकडीकाठच्या कथा मुळातूनच वाचाव्यात एवढ्या त्या ताकतीच्या आहेत.

  005 श्रावणधार श्रावणधार - प्रसिध्दी १९९९

श्रावणधारेतील ओल्याचिंब आठवणीतील पहिलीच कथा श्रावणधारा रसिक वाचकांना गायरानातल्या धुंद भुलभुलैयात गुंतून ठेवते. मनुष्य काय, प्राणी काय - तारूण्याच्या कैफात कसे धुंद होतात, मृत्यूला सामोरे जातात ह्यांची सनसनाटी कथा. सर्वच कथा मनाला हलवून टाकणार्या.

  006 डोह

डोह - प्रसिध्दी डिसेंबर, २००९

एकूण १७ कथांचा हा अपूर्व नजराणा. डोह ही कथा दो जिवांच्या ताटातूटीची. तिचे लग्न होते मनाविरूध्द. त्यामुळे झालेला दुरावा. हा दुरावा नियतीने केलेला. ती पिंजर्यातील, तो पिंजर्याबाहेर. दोघांची नदी पाणवठा डोहावर भेट होते. दोघेही जवळ असून दूर दूर.
सखाऽ, तू स्वतंत्र .. .. मी स्त्रीजन्मानं बांधलेली
म्हणजे, तू आता मी राह्यलेली नाहीस
तू समजून घे. मी आता.. ..
तरी पण.. ..
तू विसरायचं सखा, मला.
तो चालू लागतो. ती मरकी झालेली. तरीही ती त्याच्या समजुतीसाठी त्याच्यामागनं धावते. अडखळून खाली पडते. उठून उभी राहते. कुकडीमाईच्या पाणवठ्याच्या डोहात मग ती दगड फेकते. डोहात तरंगाकार तरंग उमटतात. थोड्याच वेळात डोह शांत होऊ पहातो. दगड काळजात घेऊन.

द.स.काकडे यांच्या डोह सारख्याच इतर कथाही अशाच भाव भावना हलवणार्या. घरंदाज, थोरला, सवाशीण, सोयरीक, शाण, मरण... शेवटची कथा स्वामी. ही कथा साक्षात्काराचा प्रत्यय देणारी. साध्या सोप्या सरळ शब्दात प्रभु रामचंद्रांचं दर्शन देणारी. प्रत्येक कथा वाचावी अशी.